पुणे, : आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला एका खोलीत नेत तिचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.
अतुल उत्तम आवळे (वय ३१) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. संबंधित मुलगी ही २०१४ साली आठवीत होती. त्यावेळी आरोपीने तिच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी टाकली. तू मला आवडतेस असे त्यात लिहले होते. तसेच मोबाईल क्रमांक दिला होता. या सर्व प्रकारास तिने विरोध केला होता. तसेच माझ्याशी याबाबत संपर्क करू नको, असे त्यावेळी तिने स्पष्ट केले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याने आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अतुल तिला दुचाकीवर घेऊन गेला. अज्ञात ठिकाणी नेत एका घरात नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये घेतल्याचे त्याने सांगितले. हा सर्व प्रकार तिने आईला सांगितला होता. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली.
या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी चार साक्षीदार तपासले. तर पोलिस उपनिरीक्षक एस. एस. धुमाळ यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिस हवालदार आर. पी. पराळे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.