खोटी साक्ष देणा-या साक्षीदारांविरोधात गुन्हा दाखल करा
खून प्रकरणात न्यायालयाचे आदेश, खरी साक्ष न दिल्याने झाली आरोपींची मुक्तता
पुणे : खुन झाला त्यावेळी घटनास्थळी हजर असतानाही न्यायालयात खोटी साक्ष देऊन आरोपींना वाचविणे दोन प्रत्यक्षदर्शी साथीदारांना चांगलेच महागात पडणार आहेत. खोटी साक्ष देत आरोपींना अभय दिले म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले आहेत.
गणेश ऊर्फ गोपी हनुमंत कांबळे (वय २९) आणि सूरज ऊर्फ सुरजित सुरेश जगताप (वय ३०, दोघेही रा. गंगानगर, फुरसुंगी) अशी साथीदारांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३ जानेवारी २०११ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अश्विन ऊर्फ अशोक श्रीमंत कांबळे यांचा खून झाला होता. या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी मुक्तता केली आहे.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी पाहिले. कांबळे व जगताप यांनी आरोपींविरूद्ध न्यायालयात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली आहे. घटनेच्या वेळी ते हजर होते असे अॅड. अगरवाल यांनी पुराव्याच्या आधारे दाखवून दिले. न्यायदंडाधिका-यांसमोर दिलेल्या जबाबानुसार (सीआरपीसी कलम १६४) ते आरोपींना ओळखत होते. घटनास्थळावर हजर असूनही त्यांनी त्यांच्या साक्षीतून या गोष्टी वगळल्या कारण त्यांना आरोपींना वाचवायचे होते, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
तर समाजात चुकीचा संदेश जार्इल :
खोटी साक्ष देणा-यांना शिक्षा न झाल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच, गंभीर खटल्यांमध्येही न्यायालयात खोटी साक्ष दिली जाऊ शकते, असा साथीदारांचा समज होऊ शकतो, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणातील एफआयआर, न्यायनिर्णय, दोन्ही साथीदारांचा पुरावा, सीआरपीसी कलम १६४ अन्वयेचा त्यांचा जबाब आणि अन्य साक्षीदाराचा पुरावा घेऊन कागदपत्रांसह ३० दिवसांच्या आत गुन्हा दाखल करावा, असा आदेश दिला आहे.