दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टर पत्नीवर खूनी हल्ला

0

पिंपरी : दुसरे लग्न करायचे इच्छा असणाऱ्या डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीवर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मुळशी तालुक्यातील सुस येथे घडला आहे.

दिनकर शेषेराव मस्के (35, रा. नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर पतीचे नाव आहे. याबाबत पूनम दिनकर मस्के (30, रा. सुस, ता. मुळशी. मूळ रा. नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी दोघेही पती-पत्नी असून ते डॉक्टर आहेत. आरोपी दिनकर याला दुसरे लग्न करायचे आहे. त्यावरून ‘तू मला सोडून दे. मला तुझ्या सोबत संसार करायचा नाही’ असे म्हणून पत्नीला शिवीगाळ केली. तसेच ‘मला तुमच्या सोबत संसार करायचा नाही’ असे दिनकर याला लिहून देण्याची त्याने मागणी केली.

‘लिहून दिले नाही तर संध्याकाळी कामावरून आल्यावर बघ मी काय करतो’ अशी धमकी देखील दिनकर याने पत्नीला दिली. त्यामुळे 4 मार्च रोजी फिर्यादी त्यांच्या बहिणीसोबत माहेरी येत होत्या. ही बाब दिनकरला समजली. त्याने ‘थांब तू आता. मी सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे. मी जेलमध्ये जायला तयार आहे’अशी फोनवरून फिर्यादी पत्नीला धमकी दिली.

फिर्यादी यांच्या माहेरी सुस येथील सोसायटीजवळ दिनकर थांबला. फिर्यादी आणि त्यांची बहीण कारमधून आल्या असता दिनकरने एक दगड कारच्या दिशेने भिरकावला. त्यात कारची काच फुटून फिर्यादी आणि त्यांची बहीण जखमी झाल्या. फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोके कारच्या दरवाजावर जोरजोरात आपटले. फिर्यादी यांच्या बहिणीने दिनकरला प्रतिकार केला असता त्याने फिर्यादी यांच्या बहिणीला मारहाण व शिवीगाळ केली.

‘मी आता सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे’ अशी धमकी त्याने दिली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूला गर्दी जमू लागल्याचे पाहून दिनकर तिथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.