पिंपरी : स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल या संकल्पनेत अडकून न पडता त्यातून बाहेर पडावे. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करुन देशाच्या अर्थ व्यवस्थेला हातभार लावावा असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वाकड येथे केले.
महिला दिनानिमित्त वाकड पोलीस ठाण्याच्या वतीने महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना कृष्ण प्रकाश यांनी स्वरचित कविता आणि गझल मधून स्त्रियांची व्यथा, शक्तीस्थाने यांचे महत्व सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी उर्दू, हिंदी, मराठी भाषेत महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय रायफल चॅम्पियन अंजली भागवत, मराठी अभिनेत्री शितल अहिरराव, तेजस्विनी ढोमसे-सवाई यांच्याशी निवेदिका स्नेहा दामले यांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी सर्व उपस्थित महिला पाहुण्यांनी स्त्री म्हणून जिवनात आलेलं अनुभव व्यक्त केले.
कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या वाकड पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी, पोलीस व इतर महिलांचा कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहायक आयुक्त बिरादार, वाकडचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, संतोष पाटील(गुन्हे) आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले.