पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू होणार असून, प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाची स्वतःची ‘एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी परीक्षा घेणार आहे.
पुणे विद्यापीठाची परीक्षा मंडळाची परीक्षा बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. त्यामध्ये १५ मार्च पासून घेण्यात आला होता. मात्र, परीक्षेसाठी एजन्सी निवडीवरून मतभेद असल्याने महिन्याभरात निर्णय झाला नव्हता. त्यामुळे परीक्षेचे ठरलेले वेळापत्रक कोलमडून गेल्याने मंगळवारी पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक झाली.
जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत दोन्ही सत्राची परीक्षा एकत्र घ्यावी का?, परीक्षा कोणती एजन्सी घेणार?, परीक्षेमध्ये गुणवत्ता राखण्यासाठी काय केले जाणार यासह इतर विषयांवर जोरदार चर्चा झाली. एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशनने परीक्षा घेण्याची तयारी दर्शविल्याने पत्रही बैठकीस सादर करण्यात आले. या कंपनीची क्षमता आहे का? यावरही चर्चा करण्यात आली. तसेच यापूर्वीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा ५०ः२० या सूत्रानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशा पद्धतीने ही परीक्षा घेण्याची क्षमता या कंपनीची नसल्याने ५०ः२० सूत्र रद्द करण्यात आले आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष या सर्वांची सरसकट ५० गुणांची एमसीक्यू परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘‘प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू केली जाईल. त्या वेळापत्रक २० ते २५ मार्च दरम्यान जाहीर होईल. ही विद्यापीठाची स्वतःची कंपनी असलेली एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी घेईल. ५०ः२० चे सूत्र रद्द करण्यात आले असून, सर्व अभ्यासक्रमांच्या व सर्व वर्षांच्या परीक्षा ५० गुणांची एमसीक्यू पद्धतीने होईल.’’
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू