मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास करणारे आणि हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचीही चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी एटीएसच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक युनिटमधील अधिकाऱ्यांची १० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येकाकडे वेगवगेळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात, हिरेन यांच्या कॉल डिटेल्ससह, सीसीटीव्ही तपासणी, डिजिटल पुरावे गोळा करणे तसेच घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यासह तपासासंबंधीच्या विविध पैलूंचा शोध घेण्यात येत आहे.
वाझे यांचाही जबाब नोंदविण्यात आल्याचे एटीएसच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत केलेला तपास आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबतही चौकशी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
गाडी ताब्यात असणे हा आराेप हाेऊ शकत नाही – सचिन वाझेआरोपांची माहिती घेऊन त्यानुसार उत्तर देण्यात येईल, असे सीआययू प्रमुख सचिन वाझे यांनी सांगितले. तसेच याबाबत जास्त बोलणे टाळले. स्कॉर्पिओबाबत विचारणा करताच गाडी ताब्यात असणे हा आरोप हाेऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
माझ्यावर काय आरोप केले आहेत, हे बघून त्यानुसार पुढील माहिती दिली जाईल. सध्या तपासाबाबत माध्यमांसमोर काहीही बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.