प्रतीक सुनील भावसार (२५, रा. वाकड) असे तोतया आयबी पोलिसाचे नाव आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांना एक तरुण दुचाकीवरून (एम एच 12 / एम एस 3035) विनामास्क आल्याचे दिसले.
बोधवड यांनी तरुणाला थांबवले आणि मास्क न वापरल्या बद्दल ५०० रुपये दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर तरुणाने आपण आयबी दिल्ली मध्ये कार्यरत असल्याचे सरळसोटपणे सांगितले.
बोधवड यांनी तरुणाकडे ओळखपत्र मागितले असता त्याने आयबीमध्ये कार्यरत असल्याने ओळखपत्र दाखवून ओळख सांगता येत नसल्याचे सांगितले. त्याचा संशय आल्याने बोधवड यांनी वरिष्ठांना माहिती दिली.
वरिष्ठांनी थेट आयबीमध्ये संपर्क करून संबंधित तरुणाची माहिती काढली. मात्र, असा कोणताही तरुण आयबीमध्ये कार्यरत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.