कुख्यात गुंड आंदेकरसह मटकाकिंग नाईक रुग्णालयातून मोक्का कोठडीत

कुडले हल्ला प्रकरण

0

पुणे : टोळीच्या वर्चस्व वादातून तरुणासह त्याच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कुख्यात गुंड सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर आणि मटकाकिंग नंदकुमार बाबूराव नाईक यांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला.

या बाबत ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. ७६७ गणेश पेठ. सध्या रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणात ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांना नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास बांबू आळी परिसरात ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून तसेच टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या कारणावरून आंदेकर याच्या सांगण्यावरून आरोपींनी कट रचला. त्यानंतर, कोयते, पालघण यांसारख्या धारदार हत्यारांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आंदेकर याच्या टोळीतील गुंडांनी मागील महिन्यात जीव घेणे हल्ल्यासारखे गुन्हे केले आहेत. त्यांना घातक शस्त्रे, वाहने व मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन करत आर्थिक पुरवठा केला आहे. आंदेकर व नाईक यांनी व्यापक स्वरूपाचा गुन्हेगारी कट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आंदेकर याने संघटितरीत्या गुन्हेगारी करून मिळविलेल्या आर्थिक लाभातून स्थावर व जंगम मालमत्ता निर्माण केलेबाबत तपासात निष्पन्न होत आहे. त्याबाबतच तपास करायचा असल्याने त्याला मोक्का कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.

फिर्यादीला मारण्यासाठी साथीदारांना दिले पाच लाख :
आंदेकर याने एका व्यक्तीकडून दहा लाख रुपये आणले होते. कुडले याला जीवे ठार मारण्यासाठी आंदेकर याने पाच लाख रुपये आरोपींना दिले. त्याने हे पैसे कोणाकडून आणले अथवा नाईक याने हे पैसे दिले आहेत का यादृष्टीने तपास करायचा आहे, असे ॲड. बोंबटकर यांनी न्यायालयास सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.