पुणे : परिसरात दहशत निर्माण करत अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणात तिघांची न्यायालयाने १८ मार्चपर्यंत मोका कोठडीत रवानगी केली. विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला.
ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. धनकवडी), कानिफनाथ विनोद महापुरे (वय २३, रा. २० नाना पेठ), राजन मंगेश काळभोर (वय २२, रा. मोहननगर, धनकवडी) अशी त्यांची नावे आहे. याबाबत १६ वर्षीय मुलाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. ही घटना २३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान नाना पेठ परिसरात घडली. फिर्यादी हा मित्रांसमवेत घराजवळ थांबला होता. यावेळी, आरोपी हे त्यांच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आले. त्यांपैकी महापुरे याने ‘हाच तो सूरज ठोंबरेच्या बातम्या आंदेकर टोळीला देवून, लावालाव्या करतो.
तुला आज संपवितोच, सुरजभाऊ ठोंबरेनी यालाच संपवायला सांगितले’ आहे असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तर त्याच्या अन्य साथीदारांनी शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांना मोका कोठडी देण्याची मागणी मोका विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपींना १८ मार्चपर्यंत मोका कोठडी सुनावली.