मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू लगेच होतो, विधानसभेत त्यावर चार दिवस गदारोळ होतो हे सर्व रहस्यमय प्रकरण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहे. या सर्व प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे सगळ्यात आधी पोहोचत राहिली. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत, असं रोखठोकमध्ये म्हटलंय.
मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळ्यात मोठे यश.
मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळ्यांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे असे सगळ्यांनाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल.