पुणे: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीन स्फोटक प्रकरणात अंबानी यांची तक्रार कुठे आहे? असा सवाल वकील असीम सरोदे यांनी केला आहे. तसेच सचिन वाझेंच्या प्रकरणात राजकारणच अधिक होताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी अंबानी यांनी लेखी तक्रार केली आहे का? पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेतलं आहे का किंवा अंबानी यांनी त्यांचंच स्टेटमेंट दिलं आहे का? हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. ज्यांच्याविरोधात कट रचला गेलाय त्यांची स्टेटमेंटच नाहीये. त्यामुळे या प्रकरणात राजकारण होत असल्याचं दिसून येतं, असं सरोदे म्हणाले.
सचिन वाझेच्या कारवाईत राजकारण जास्त दिसतंय. कायद्याचा राजकारणासाठी आपल्या सोयीनुसार वापर केला जातोय, असं सांगतानाच खरंतर एनआयएनं राष्ट्रीय गुन्ह्याचा तपास करणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी सांगितलं.
वाझे यांनी काही चूक केलं असेल तर त्यांना शिक्षा मिळणारच. मात्र, त्यासाठी त्यांची नार्को टेस्टची मागणी काही सुमार दर्जाचे नेते करत आहेत. नार्को टेस्ट करणं हे बेकायदेशीर आहे. ही मागणी चुकीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने सात वेगवेगळ्या प्रकरणात त्याबाबतचा निर्णय दिला आहे.