शरद पवारांनी घेतली CM ठाकरेंची भेट; मंत्रिमंडळात होणार खांदेपालट ? गृहमंत्री पदाबाबत चर्चा ?

0
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझेंच्या अटकेचे पडसाद आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उमटल्याचे पाहायला मिळत असून, राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची खाते बदलण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील परिस्थिबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. खास करून सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला विरोधकांच्या टिकेला सामोरे जावं लागलं, यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दोन्ही नेत्यांच्या चर्चेदरम्यान मंत्रिमंडळातील खाते बदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या मंत्र्यांच्या विभागामध्ये काही बदल करायचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी संबंधित मंत्र्यांना खाते बदलाबद्दल माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे खाते बदलणार, कोणत्या मंत्र्याचे मंत्रिपद जाणार आणि कोणत्या आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शरद पवारांनी बोलावली मंत्र्यांची बैठक
पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण प्रकरणापासून ते मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेपर्यंत कोणत्या ना कोणत्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी स्थापन करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर राष्ट्रवादीने बोलावलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.