पिंपरी : इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स हा भारत भेटीवर आला असता त्याला जबरदस्तीची भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार देण्यात आली. ही तलवार परत भारतात आणावी यासाठी कोल्हापूर येथील पाच तरुणांनी गहुंजे स्टेडियमवर भगवा झेंडा रोवला. तसेच ‘इंग्लंड टीम गो बॅक’ अशा घोषणा देखील दिल्या.
हर्शल अशोक सुर्वे, प्रदीप पांडुरंग हांडे, विजय सुभाष दरवान, देवेंद्र नंदकुमार सावंत, आशिष चंद्रशेखर आष्टेकर (सर्व रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 143, 452, 506 (1), 188, 269, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3), 135, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3, कोविड 19 नियम 2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्टेडीयम वरील सुरक्षा रक्षक दिपक मुंडे (वय 28) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरोपी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडीयमवर आले. स्टेडीयममध्ये जबरदस्तीने जाऊन भगवे झेंडे स्टेडीयमच्या मैदानात रोवले आणि तेथेच बसले. आरोपींनी ‘इंग्लंड टीम गो बॅक’ अशा मोठमोठ्याने ओरडून घोषणा दिल्या.
याच मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड असे 23, 26 आणि 28 मार्च रोजी एकदिवसीय क्रिकेट सामने होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मैदानाची सफाई सुरु असताना हा प्रकार घडला. त्यामुळे मैदानातील स्टाफ घाबरून पळून गेला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याने तळेगाव दाभाडे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अल्पवयीन असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स हा भारत भेटीवर आला. सन 1875-76 मध्ये प्रिन्सला जबरदस्तीची भेट म्हणून जगदंबा तलवार देण्यात आली. ती तलवार भारतात परत यावी.’
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.