चाको म्हणाले की, त्यांनी आपला राजीनामा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पक्ष सोडण्याचा विचारात होतो, असेही ते म्हणाले. ‘कॉंग्रेसमध्ये आता लोकशाही शिल्लक राहिली नाही. निवडणूकीच्या मैदानात उतरवल्या गेलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत प्रदेश कॉंग्रेसशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.
केरळमध्ये 6 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात गटबाजी झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चाको यांनी कॉंग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिले आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याचे संकेत स्वतः चाको यांनी दिले आहेत. त्यामुळे केरळ कॉंग्रेसच्या अडचणींत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.