रेमिडेसिव्हरसाठीची रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक थांबवा
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्राकांतदादा पाटील यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली असून, यासंदर्भातील हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सदर आदेशाचे पालन होत नसून, रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ही पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
मार्च २०२० मध्ये करोनामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतरच्या काही महिन्यात रेमिडेसिव्हर या इंजेक्शनची मागणी एकदमच वाढल्याने याचा तुटवडा निर्माण झाला होता. हे इंजेक्शन महाग असल्याने नंतर याची किमत कमीही करण्यात आली. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्शन बाजारात उपलब्ध असून अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना १०% नफा घेऊन विकण्याचा आदेश दिला आहे. मात्र, कंपनीच्या मूळ किंमतीपेक्षा विक्रीची (MRP) किंमत चार ते पाच पटीने जास्त असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमिडेसिव्हर या इंजेक्शनचे ६ इंजेक्शनचे डोस द्यावे लागतात. त्यातच MRP प्रमाणे या इंजेक्शनच्या सहा डोसची किंमत ३० ते ३२ हजार दरम्यान होते. MRP जास्त असल्याने आणि शासनाचा आदेश पाळण्यावर कुठलीही देखरेख नसल्याने रुग्णांची पिळवणूक होत आहे. तरी जर MRP कमी करणे शक्य नसल्यास कंपनीने एका इंजेक्शनवर पाच इंजेक्शन मोफत द्यावेत किंवा MRP कमी करावी म्हणजे रुग्णांची होणारी पिळवणूक थांबेल, अशी मागणी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.