अरुण भेलके हा मिलिंद तेलतुंबडेच्या उपस्थित मला जंगलात भेटला
शरणागत नक्षलवादी कृष्णा दोरपटेची न्यायालयात साक्ष
पुुणे : अरुण भेलके हाच राजन आहे. तो माओवादी नेता दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे सोबत माओवादी चळवळीत काम करीत. अरुण व त्याची पत्नी दोघे शहरी भागात माओवादी चळवळीचे काम करायचे. जंगलात त्याची व आपली तेलतुंबडेच्या उपस्थित भेट व चर्चा झाली आहे, अशी साक्ष शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने न्यायालयासमोर दिली.
दोरपटे हा गडचिरोली येथील शरणागत नक्षलवादी आहे. माओवादाच्या गुन्ह्यात अटक अरुण भेलके प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर त्याची बुधवारी साक्ष झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. उज्वला पवार यांनी कृष्णाची सरतपासणी घेतली. मी नक्षल दलामध्ये सक्रिय असताना जंगलात दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेची भेट झाली. तेव्हा त्यासोबत शहरी भागात काम करणारे जानकी, समर व अन्य काही जण सोबत होते, असेही कृष्णाने न्यायालयात सांगितले.
दरम्यान, अरूणचे वकील रोहन नहार यांनी उलट तपासणी घेतली. नहार यांनी कृष्णा व आरोपीची भेट झालेली नसून, कृष्णा हा शरणागत नक्षलवादी असल्याने सरकारकडून मदत मिळेल या आशेने पोलिसांनी सांगितल्यानुसार जबानी देत असल्याचे म्हटले. अरुण याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. तो एकेकाळी नक्षलप्रेमी असेल पण त्याच्या पत्नीच्या आजारपणामुळे तो २०११ पासून पुणे- मुंबई या ठिकाणी राहत आहे. त्याच्यावर पूर्वीचे प्रलंबीत गुन्हे असल्यामुळे तो नाव बदलून राहतो म्हणजे, त्याचा या गुन्ह्याशी संबंध आहे हे म्हणणे चुकीचे आहे. त्याने कोणताही गुन्हा केला नसल्याचे व नक्षलवादी चळवळीत तो कार्यरत नसल्याचे नहार यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.
कांचनच्या वस्तू अरुणला द्याव्यात :
कांचन हिचा नुकताच मृत्यू झाला आहे. तिच्या वस्तू व त्यांनी लिहिलेली पत्रे, तीने कारागृहात केलेले लिखाण हे कारागृह प्रशासनाने त्यांच्याकडे आहे. ते मिळण्याचा अधिकार अरुणला आहे. परंतु, कारागृह कांचनच्या वस्तू अरुणला द्यायला विरोध करत आहे. त्यामुळे न्यायालयाने त्या वस्तू अरुणला देण्यासंबंधी आदेश करावेत, अशी मागणी ॲड. नहार यांनी न्यायालयाकडे केली.