शहरात ‘हे माझं चुकलं का ?’ या फ्लेक्सची चर्चा

0

पिंपरी : चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भारतीय जनता पक्षाची सेवा करतंय हे आमच्या कुटुंबाचे चुकलं का, गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला, हे माझं चूक झाली का’? असे सवाल विचारणारे फलक भोसरी विधानसभा मतदार संघात झळकत आहेत. या फलकांची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलेले भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांचे फलक झळकले आहेत. रवी लांडगे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. युवा मोर्चाचे शहराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांचे वडील बाबासाहेब लांडगे, चुलते अंकुशरराव लांडगे यांनी शहरात भाजप रुजविली. प्रतिकुल परिस्थितीत भाजप वाढविली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा धावडेवस्ती, भगतवस्ती मधून रवी लांडगे बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आलेले ते एकमेव नगरसेवक आहेत.

चार वर्षांत त्यांना एकही पद मिळाले नव्हते. शेवटच्या वर्षी त्यांची स्थायी समितीत वर्णी लागली आणि समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत त्यांचे नाव होते. शहरातील भाजपच्या जुन्या, निष्ठावंतांनीही रवी यांचे नाव पुढे केले होते. पण, ऐनवेळी निष्ठावान असूनही त्यांना डावलण्यात आले. अन्याय झाल्याचे सांगत रवी यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडेही पाठ फिरविली. महापौरांनी अद्याप राजीनामा स्वीकारला नसतानाही रवी यांनी दोन स्थायी समितीच्या सभांनाही जाणे टाळले.

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी शब्द देवूनही डावलल्याने रवी लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ”गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला, हे माझं चुकलं का”? ”चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भारतीय जनता पक्षाची सेवा करतंय हे आमच्या कुटुंबाचे चुकलं का”? ”सोयीच राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगिकृत केले. हे माझं चुकलं का”? ”माझ्या वडिलांनी शहरात भारतीय जनता पक्षाचा पाया रोवला. माझ्या चुलत्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि मीही पक्षनिष्ठ राहिलो हे आमच्या कुटुंबाच चुकलं का”? असे प्रश्न विचारणारे फलक रवी लांडगे यांचे भोसरी मतदारसंघात झळकले आहेत.

दिघी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, भोसरी या भागात हे फलक आहेत. या फलकांवर भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, बाबासाहेब लांडगे, अंकुशराव लांडगे यांचे छायाचित्र वापरले आहे. We Support Ravi Landge असे लिहिले असून भाजपचे चिन्ह कमळाचे छायाचित्र देखील आहे. या फलकांची भोसरी मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.

माझे वडील 1986 आणि 1992 मध्ये भाजपच्या तिकिटावर महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर 1997 मध्ये चुलते अंकुशराव लांडगे निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या ‘रोपा’चा वटवृक्ष केला. अंकुश लांडगे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आशा लांडगे महापालिकेवर निवडून आल्या. 2017 मध्ये मी बिनविरोध निवडून आलो. गेली 40 वर्षे आम्ही भाजपशी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करत आहोत. महापालिकेत सत्ता आल्यावर किमान सन्मानाचे पद मिळावे, अशी आमची इच्छा होती. परंतु, पक्षात जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरू आहे, असल्याचा आरोपही रवी यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.