पुणे : काळापैसा बदलून देण्यासाठी २५ लाखांच्या बदल्यात ५० लाख देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात अटक आरोपींचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
प्रवीण प्रकाश वनकुंद्रे (वय ४८, रा. औंध), मालेश ऊर्फ महेश सुरेश गावडे (वय ४२, रा. चिंचवड) आणि व्यंकटरमणा वसंतराव बाहेकर (वय ४०, रा. सिंहगड रोड) अशी पोलिस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हॉटेल व्यावसायिक अंतेश्वर जगन्नाथ शंबाळे (वय ३६, रा. शिवणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे. कसबा पेठेमध्ये २३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. वनकुंद्रे हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे.
फिर्यादीने वनकुंद्रेच्या माध्यमातून नाशिक येथे शेअर बाजारात पैसे गुंतविले होते. त्यामध्ये नुकसान झाल्याने फिर्यादी तोट्याची रक्कम वनकुंद्रे याच्याकडे मागत होता. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून त्यांच्याकडे ५० लाख रुपयांचा काळा पैसा असल्याचे फिर्यादींना सांगितले. त्यामुळे तु आम्हाला दोन हजार रुपयांच्या २५ लाख रुपयांच्या नोटा दिल्यास त्याबदल्यात आम्ही ५०० रुपयांच्या ५० लाख रुपयांच्या नोटा देऊ, असे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी २५ लाख रुपये आरोपींना दिले. मात्र आरोपींनी ५० लाख रुपये देण्या एवजी वर्तमानपत्राच्या कागदांचे नोटांच्या आकारात कट केलेले बंडल फिर्यादींना दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली होती. अटक झाल्यानंतर पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपींकडून मोबाईल व वाहने जप्त :
तपासादरम्यान आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीचे तीन मोबार्इल, दोन दुचाकी आणि एक चारचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील सुरेखा क्षीरसगार यांनी केली होती. त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.