गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्नच नाही

0

नवी दिल्ली : लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारण ढवळले आहे. भाजपनं गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक भुमिका घेतली आहे. मात्र गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्नच नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राजनाधी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

त्यावेळी पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे.

तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले. त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. पण मी त्या खोलात जात नाही. सध्या जे प्रमुख विषय आहेत त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असंही पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.