बिहारला पळून निघालेल्या दरोडेखोरांना अटक; 20 लाखांचा ऐवज जप्त

0
पिंपरी : ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाच्या अंगावर चादर टाकून चालकाला दाबून ठेवले. त्यानंतर ट्रक चालवत नेऊन ट्रकमधून 20 लाख रुपयांचे ऑटोमोबाईल पार्ट जबरदस्तीने काढले. हा प्रकार बुधवारी (दि. 17) पहाटे खेड तालुक्यातील कुरुळी ते महाळुंगे या मार्गावर घडला. यातील तीन दरोडेखोरांना पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. हे आरोपी नाशिक येथून बिहारला पळून जात होते. तर त्यांच्या पाच साथीदारांचा शोध सुरु आहे.

रणजितकुमार रामसेवक दास (32, रा. बथनाह, ता. कुनौली, जि. सुपौल, बिहार), सुशील रामअवतार कामत (36, रा. कुनौली बजार, ता. कुनौली, जि. सुपौल, बिहार), शैलेंद्रकुमार शिवलखन मंडल (32, रा. कोईलाडी तैलाठी, हनुमान नगर, जि. सप्तरी, नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी रवी सुभाष चंदनशिवे (47, रा. वाघोली) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदनशिवे हे ट्रक चालक आहेत. बुधवारी रात्री ते त्यांच्या ट्रकमध्ये कुरुळी येथे झोपले होते. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास दरोडेखोर आले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून ट्रकची चावी घेतली. फिर्यादी यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना दाबून ठेवले. ट्रक चालू करून तो महाळुंगे पर्यंत चालवत नेला. त्यानंतर आरोपींनी गाडीतील 19 लाख 99 हजार 405 रुपये किमतीचे सब असेम्ब्ली मोटार युनिटस्टार्टर (ऑटोमोबाईल पार्ट) दुस-या गाडीत काढून घेतले.

याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी दोन पथके तयार केली. दरम्यान, हे दरोडेखोर नाशिकमार्गे बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार म्हाळुंगे पोलिसांनी नाशिकला धाव घेतली. नाशिक पोलीस, नाशिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने १२ तास रेल्वे स्थानकावर सापळा लावण्यात आला.

पोलिसांची नजर चुकवून आरोपी रेल्वेत बसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यात तिघेजण पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींकडून 19 लाख 99 हजार 405 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक ९गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, राजू कोणकेरी, राजू जाधव, अमोल बोराटे, विठ्ठल बडेकर, ऋषिकेश भोसुरे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, हिरामण सांगडे, श्रीधन इचके, शरद खैरे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.