मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदारांच्या शिष्टमंडळांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. भाजप नेत्यांकडून ही सदिच्छा आणि पूर्वनियोजित भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. पण राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थितीत होते.
विशेष म्हणजे, याच महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या तडाख्यामुळे महाविकास सरकार पार गळून गेल्यासारखं दिसायला लागलंय. दर काही दिवसांनी फडणवीसांचे येणारे नवे गौप्यस्फोट, एनआयए आणि एटीएसच्या चौकशीतून येणारी नवनवीन माहिती आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक प्रकारे केलेलं बंड यातून सरकारला सुधारत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर या सगळ्या प्रकरणात सत्ताधारी शिवसेना पक्ष एकटा पडल्यासारखा दिसत होता. पण 20 मार्चला परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत आले आहेत. पक्ष आणि सरकार बॅकफूटवर जात आहे हे पाहताच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतून खिंड लढवली खरी पण अजूनही फडणवीसांच्या तडाख्याला सत्ताधारी पक्षांना हवं तसं उत्तर देता आलं नाही.