पिंपरी : शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 2288 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. यापूर्वी 28 मार्च रोजी 2275 रुग्ण आढळून आले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2288 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 40 हजार 138 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1410 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 20 हजार 322 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 3329 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 रुग्ण शहरातील आहेत. तर 3 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2840 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2003 तर हद्दीबाहेरील 837 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण भोसरी, चिखली, पिंपळे गुरव, थेरगाव, पिंपरी, चिंचवड, यमुनानगर, काळेवाडी, निगडी, दिघी, रहाटणी, खडकी, राजगुरुनगर येथील रहिवाशी आहेत.