पिंपरी : एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ख्याती असणारे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव हे मंगळवारी पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तपदी रामचंद्र जाधव हे होते. याच बरोबर अतिक्रमण विभागात कार्यरत असेलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश ठाकरे, सांगावी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भालेराव आणि वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंपी हे पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांच्या निरोप समारंभासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त राम जाधव हे 1988 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना पोलीस महासंचालक यांचे देखील सन्मान चिन्ह / बोध चिन्ह मिळाले आहे. त्यांनी त्यांच्या सेवा काळात काही एन्काउंटर देखील केले. त्यातील काही प्रकरणे सकारात्मकतेने राज्यभर चर्चेत राहिली. त्यामुळे जाधव यांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली होती.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, तुम्ही निवृत्त झाले नाहीत. समाजामध्ये आणि पोलीस दलासाठी तुम्ही नेहमी पोलीसच राहणार आहात. पोलीस दलात येऊन कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाचीच बाब आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुढील काळात आपले केव्हाही स्वागत असेल. कोरोनाच्या कठीण काळात समाजासाठी आपण दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे म्हणत आयुक्तांनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.