पुणे : वटपौर्णिमेच्या दिवशी रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे चोरणा-यालाया न्यायालयाने एक वर्षे आठ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. राणे यांनी हा निकाल दिला.
मोहसीन अब्बास शेख (वय ३०, रा. गंज पेठ) याला शिक्षा सुनावण्यात आली. पाषाण व बाणेर परिसरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यात ही शिक्षा देण्यात आली आहे. पहिली घटना २७ जून २०१८ रोजी पाषाण परिसरातील साई चौकात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेच्या दिवशी वटपौर्णिमा असल्याने फिर्यादी या पूजेसाठी विड्याचे पान आणण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. तर, दुसरी घटना याच दिवशी बाणेर परिसरात घडली. याप्रकरणी आरोपींला अटक करत त्याविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस नाईक रमाकांत बारामतीकर यांनी मदत केली.