पिंपरी : शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रुग्णालयातील बेड कमी पडू लागले आहेत. बेड अभावी बाकड्यावर रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागत आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) आणि विलगीकरण सेंटर तात्काळ सुरु करावेत, अशी सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी प्रशासनाला केली आहे.
मागील दोन महिन्यांपासून शहरातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे बेडची कमतरता भासताना दिसून येत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सीसीसी सेंटर चालू करण्याची आवश्यकता आहे. ज्या नागरिकांच्या घरात जागा नाही. होम आयसोलेशन करिता सुविधा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी सीसीसी सेंटर सुरु करण्याची नितांत गरज आहे.
मागील वर्षी बेडची कमतरता भासत असल्याने महापालिकेमार्फत कॉलेज, हॉस्टेलमध्ये सीसीसी, विलगीकरण सेंटर सुरु केले होते. ज्यांच्या घरी विलगीकरणासाठी जागा नाही, कोरोना पॉझिटीव्ह आहे. पण, लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना सीसीसी सेंटरमध्ये दाखल केले जात होते. परंतु, कालांतराने रुग्णसंख्येत घट झाल्याने सीसीसी सेंटर बंद केले होता. आता पुन्हा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यासाठी तात्काळ सीसीसी, विलगीकरण सेंटर सुरु करण्याची सूचना उपमहापौर घुले यांनी प्रशासनाला केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.