मुंबई : सीबीआय चौकशीला न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाली अन् राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे-पाटील यांची वर्णी लागलेली आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं आज मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करत देशमुख यांच्यावरील आरोपाची 15 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश सीबीआयला दिले. त्यानंतर स्वतःहून अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आता राज्याचे नवीन गृहमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली.
दरम्यानच राज्याच्या गृहमंत्री पदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. यापुर्वी वळसे पाटील यांनी कामगार कल्याण आणि उत्पादन शुल्क, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जा सारख्या विभागाचे मंत्रीपद भुषविले आहे. सन 1990 पासून सलग 7 वेळा विधानसभा सदस्य म्हणून वळसे पाटील राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. सन 2009 ते सन 2014 दरम्यान त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद देखील सांभाळले होते.
वळसे पाटील यांना गृहमंत्री पद मिळणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर ती चर्चा सुरू झाली होती.