मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी नव्या गृहमंत्र्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा आणि गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. या पत्रात दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ajit pawar यांच्याकडे देण्यात यावा. तसेच कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. यामध्ये शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावे आघाडीवर होती. मात्र, आता दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली खाती अजित पवार ajit pawar आणि हसन मुश्रीफ यांना मिळाली आहेत.