रेशनिंग दुकानातील बायोमेट्रिक पद्धत तात्पुरती बंद करा : आमदार लक्ष्मण जगताप

0

पिंपरी : रेशनिंगचे धान्य देण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका वेळीच ओळखून रेशनिंग दुकानातील बायोमेट्रिक पद्धतीला काही काळापुरती स्थगिती देण्यात यावी. थम्ब न घेताच नागरिकांना धान्य वाटप करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सध्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा झपाट्याने प्रसार होत आहे. दररोज जवळपास पाच हजार कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास या रोगाचा विस्फोट होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागतील. या प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये रेशनिंग दुकानातून धान्य देण्यासाठी राबविण्यात येणारी बायोमेट्रिक पद्धत बंद करण्याचा समावेश करण्यात यावा.

राष्ट्रीय अन्न नागरी सुरक्षा योजनेअंतर्गत बायोमेट्रिक पद्धतीने नागरिकांचे अंगठ्याचे थम्ब घेऊन धान्य वितरित करण्यात येते. मात्र यामुळे कोरोना संसर्ग अधिक वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी रेशनिंग दुकानदार आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रेशनिंग दुकानातील बायोमेट्रिक पद्धतीला काही काळापुरती स्थगिती देण्यात यावी.

रेशनिंग दुकानात येणाऱ्या नागरिकांचे थम्ब न घेता धान्य वाटप करण्याबाबत शहरातील सर्व रेशनिंग दुकानदारांना आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करावेत. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. तसेच रेशनिंग दुकानदार व नागरिक यांनी योग्य ती दक्षता घेणेकामी आपल्या स्तरावर संबंधितांना योग्य त्या कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.