कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय रद्द करा : मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले

0
पिंपरी : कोरोनाची लागन झाल्यामुळे शहरातील तीन नगरसेवकांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्याठिकाणी पोटनिवडणुका लागणार आहेत. सध्या कोविड 19 संसर्ग जोरात पसरत आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच रुग्णालयात बेड्सची उपलब्धता कमी भासू लागली आहे. अशा परिस्थितीत तीन जागेसाठी घेण्यात येणा-या पोटनिवडणुका रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

यासंदर्भात चिखले यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मार्च 2020 मध्ये कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर शहरातील मोलमजुरी करणा-या नागरिकांची उपासमार झाली. त्यांना अन्नधान्य वाटप करताना प्रभाग क्रमांक 1 चिखलीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांना कोरोना विषाणुची बाधा झाली. त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 14 आकुर्डी येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांना देखील कोरोना विषाणुची बाधा झाली. त्याचबरोबर प्रभाग 4 दिघीचे भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला. रुग्णालयात उपचार घेत असताना दोघांचेही निधन झाले.

नगरसेवकांच्या तीन जागांसाठी पोटनिवडणुका घेण्याचे प्रशासनाच्या नियमाधीन आहे. एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक घेण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु, सध्याची कोविड बाधीत परिस्थिती पाहता निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही. कारण, निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणा, प्रचार यंत्रणा, निवडणूक आयोगाचे पूर्वनियोजन, मतदारांची धावपळ, घरोघरी भेटीगाठी आदी बाबींसाठी लोकांचा एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोरोनाला पुन्हा आमंत्रण दिल्यासारखे होणार आहे. शिवाय, नवीन नगरसेवकांना काम करण्यासाठी किमान सहा महिन्याचाच अवधी मिळणार आहे. त्यातच कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत त्यांना काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे निवडणूक घेण्यासाठी आखण्यात येणारा कार्यक्रम निव्वळ व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे या तीन जागांसाठी होणा-या पोटनिवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी चिखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.