खातेधारकांची गोपनीय माहिती पुरविणा-यासह दोघांना अटक

बँक डेटा चोरी प्रकरण

0

पुणे : विविध बँकेतील खातेदारांच्या बँक खात्यातील गोपनीय माहिती चोरी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. त्यातील एक बँकेचा कर्मचारी असून, त्याने बँक खातेधारकांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती पुरविल्याचे समोर आले आहे.

भीमसेन राजेंद्र सिंग (वय ३६, रा.विश्वकर्मा संकुल, ठाणे) आणि शैलेंद्र अशोक सिंग (वय ३८, रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. शैलेंद्र सिंग हा एचडीएफसी बँकेतील कर्मचारी आहे.
भीमसेन सिंग याने व त्याचा मित्र लवकुश या दोघांनी मिळून शैलेंद्र सिंग याच्याकडून बँकेतील खातेधारकांच्या बँक खात्यांची सविस्तर माहिती मोबाईल व्हॉटसअपद्वारे दिली. भीमसेन सिंग याने त्याच्याकडील मोबाईल फोनमधील बँकाच्या डॉरमट खात्याची व इतर बँक खातेधारकांची माहिती व्हॉटसअपद्वारे मिळविल्यानंतर नष्ट केली आहे, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

शैलेंद्र सिंग आणि भीमसेन सिंग यांनी बँकेच्या खातेधारकांची गोपनीय माहिती आणखी कुणाला दिली आहे का? याबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याबाबत सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन काही जणांना अटक केली होती. त्यामध्ये मोबाईल डेटा पुरविण्याचे काम करणा-या एकाला गुजरातमधील
वापी येथे जाऊन पोलिसांनी अटक केली होती. तसेच आणखीही तपास पोलिसांकडून सुरू होता. आता या प्रकरणात आणखी दोन जण पोलिसांच्या हाती लागले आहेत.

यापूर्वी अटक आरोपी :
रवींद्र महादेव माशाळकर (वय 34), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34) मुकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34), रोहन रवींद्र मंकणी (37), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45), सुधीर शांतिलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय 54), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42), परमजित सिंग संधू (42), अनघा अनिल मोडक (वय 40), दिलीप लालजी सिंग (वय 30) यांना अ़टक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.