शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर छळाचा आरोप

0

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. स्वप्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. स्वतःला सुशिक्षित आणि सशक्त भारतीय महिला म्हणून वर्णन करताना तिने पत्रात लिहिले आहे की, तिला सहानुभूती नव्हे तर न्यायाची गरज आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ चे सहसंपादक संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचा वापर करून आणि यंत्रणेला धरून वेळोवेळी अपमान केला, असा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. ‘माइंडवर्क्स ट्रेनिंग सिस्टम्स’ नावाचे समुपदेशन क्लिनिक चालवणाऱ्या  या महिला डॉक्टरने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात असा आरोप केला आहे की,  “वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकरणांमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले.

‘शिवसेना भवन’च्या तिसर्‍या मजल्यावर  नातेवाइकांना कॉल करून बोलावण्यात आले आणि मारहाण केली गेली,  माझ्याशी संबंध तोडण्यास भाग पाडले गेले. सर्व काही संपवण्यासाठी चार कोटी रुपयांच्या वसुलीचा प्रस्ताव ठेवला.” असा आरोप महिला डॉक्टरने केला आहे.

“पोलिसांकडे चौकशी करूनही जेव्हा संजय राऊतांचा राक्षसी आनंद पूर्ण होत नाही तेव्हा तेव्हा मला त्रास दिला, छळ व बदनामी केली गेली. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. राऊत म्हणतात की, तू पोलिसांकडे गेली तरी काहीही होणार नाही. २०१३ मध्ये माझ्यावर दोनदा हल्ला झाला. अद्याप तपास सुरू आहे. मात्र कोणताही सुगावा मिळाला नाही.

२०१४ मध्ये एसीपी प्रफुल्ल भोसले यांनी माझ्याविरुद्ध कोणतेही कारण न सांगता चौकशी सुरू केली. संजय राऊत यांच्याकडून खंडणी मागितल्याचा माझ्यावर आरोप होता. २०१५ मध्ये मी त्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर मला धमक्या मिळाल्या. मी कोणाशी बोलते  आणि कोणाशी बोलत नाही यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मी कुठे जात आहे, काय करीत आहे यावर  संजय राऊत लक्ष ठेवत असे. मी कुठे गेले  आणि कोणास भेटले  हे सांगण्यासाठी मला रोज ई-मेल पाठवावे लागत. त्याला मी प्रतिसाद दिला नाही तर पोलीस नव्या प्रकरणात अडकवण्याची भीती होती.

माझ्या सहकारी कर्मचार्‍यांना खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बनविण्यात आले होते. याबाबत मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे लेखी तक्रारीसह गेले होते; परंतु पोलीस एनसीडब्ल्यूचादेखील आदर करीत नाहीत.” पत्रात डॉ. पाटकर यांनी  संजय राऊत यांच्यासाठी ‘दरिंदा’ हा शब्द वापर करत लिहिले आहे की, अजूनही मला अश्लील व्हिडीओ कॉल आणि शिवीगाळ सुरूच आहे.

स्वप्ना पाटकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना संजय राऊत यांच्या कृत्याबद्दल सांगितले; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मनसुख हिरेन आणि पूजा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, त्यांचा मृत्यू झाला तर ती आत्महत्या असणार नाही.

डॉ. पाटकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून अनेक स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत, ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल पाठवल्यानंतर आलेली पोचपावती दिसून येते. तसंच संजय राऊत यांना  निरोप पाठवत असल्याचा दावा करत एक गप्पांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.