पिंपरी : कुख्यात गुंड गजा मारणे याच्या समर्थनात काढलेल्या रॅलीत सहभागी होऊन, सहकार्य करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गजा मारणे यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोड्यासह रॅली काढल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. तर हिंजवडी पोलीस ठाण्यातही रॅली काढल्याप्रकरणी एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 59 जणांना अटक केली आहे. तर रॅलीमध्ये सहभागी झालेली 23 वाहने जप्त केली आहेत. रॅलीसाठी पुणे, सातारा, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड शहरातील सात वाहने सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष संजय पिसाळ आणि शिवसेनचा तालुका अध्यक्ष संतोष शेलार यांचाही समावेश आहे. तसेच मोक्कातील आरोपी इजाज पठाण आणि खून प्रकरणातील आरोपी राहुल दळवी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दळवी याने रॅलीमध्ये एक मर्सिडिज आणि स्वॉडा या दोन अलिशान वाहने पुरविल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुख्यात गुंड गज्या मारणे याला सातारा जिल्ह्यातून अटक केल्याचे सांगितले जात आहे. मात्र तो पोलिसांना शरण आला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्याला शरण आणून देण्यात सातारा जिल्ह्यात जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचा एक नेता आणि पुणे शहरातील एका भाजपचा नेता याने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.