कोणताही निर्णय झाला तरी सोमवारी दुकाने उघडणार : रांका

0

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याला विरोध करत व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. याला मुख्यमंत्री यांनी दोन दिवसांची वेळ मागितली असून त्या कालावधीत ते निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सोमवारी कोणताही निर्णय आला तरी व्यापारी आपली दुकाने उघडणार असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

फत्तेचंद रांका म्हणाले, “राज्यातील 60 असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) सकाळी साडेदहा पासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुपारी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यात येणार होती. परंतु त्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील व्यापारी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत याबाबत पुन्हा चर्चा झाली आहे. पुणे पालिकेचे आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस निरीक्षक यांच्याशी देखील व्यापा-यांचे बोलणे झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस वेळ मागितला असून त्यात ते निर्णय घेणार आहेत. त्यांच्या शब्दाला मान ठेऊन दोन दिवस थांबा. शुक्रवारी एक दिवस दुकाने उघडणार आणि नंतर दोन दिवस बंद ठेवणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान द्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

असोसिएशनच्या 50 व्यापा-यांची ऑनलाईन माध्यमातून बैठक झाली. त्यातील 46 सदस्यांनी एक दिवस थांबावं असं मत व्यक्त केलं. तर अन्य चार सदस्यांनी असोसिएशन जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन शुक्रवारी दुकाने न उघडता सोमवार पासून दुकाने उघडली जाणार आहेत. तोपर्यंत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो घेतील. पण सोमवारी कुणाच्याही आदेशाची वाट न बघता दुकाने उघडली जाणार असल्याचेही रांका यांनी सांगितले.

सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या मेसेजबाबत बोलताना रांका म्हणाले, “दुकाने जबरदस्तीने उघडल्यास सील केली जाणार असल्याचा संदेश माझ्या नावाने पसरवला जात आहे. तो मेसेज चुकीचा आहे. असोसिएशनच्या नावाने बनावट मेसेज बनवून तो महाराष्ट्रभर पसरवला जात आहे. असे चुकीचे मेसेज पसरवू नये. फेडरेशनच्या सदस्यांनी अशा कोणत्याही मेसेजला बळी पडू नये. फेडरेशनकडून अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये. पोलीस प्रशासन व्यापा-यांना सहकार्य करत आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.