महिलेचा विनयभंग करत १० वर्षाच्या मुलीला चालत्या कारमधून बाहेर फेकले

0

मुंबई : अहमदाबाद महामार्गावर इको गाडीत एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करत आरोपींनी पीडितेच्या १० महिन्यांच्या मुलीला कारमधून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर पीडित महिलेने मुलीला वाचवता यावे यासाठी धावत्या गाडीतून बाहेर उडी घेतली. या घटनेत १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा या तालुक्यातील पिंपलास येथील रहिवासी असलेल्या या पीडित महिलेचा पती नालासोपारातील एका कंपनीत कामाला आहे. सदर महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी नालासोपारा येथे गेली होती. त्यानंतर ही महिला शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा- पेल्हार येथून वाडा येथे जाण्यासाठी एका इको गाडीत बसली. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर इको गाडीतील चालक व प्रवाशांनी विरार फाटा येथे पीडित महिलेची छेड काढत तिचा विनयभंग केला व तिच्या मुलीला कारमधून बाहेर फेकले.

आपल्या मुलीला वाचवण्यासाठी महिलेनेही धावत्या कारमधून उडी घेतली. या घटनेत दहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. महिला जखमी झाली असून तिच्यावर नालासोपारा पूर्वेकडील वसई- विरार महानगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चालक व प्रवाशानी छेड काढून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ईको गाडीच्या चालकाला मांडवी पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारही ताब्यात घेतली आहे. त्याचप्रमाणे गाडीत बसलेल्या इतर प्रवाशांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.