पिंपरी : फुगेवाडीत आज (शनिवारी, दि. 28) सकाळी आठच्या सुमारास जुन्या इमारतीचा आतील भाग व एका बाजूची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 13 वर्षीय मुलीला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तिच्या पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीला बाहेर काढताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी एकच जल्लोष केला.
पौर्णिमा मडके (वय 13) असे ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलेल्या लहान मुलीचे नाव आहे. अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास फुगेवाडी येथील देवकर यांची 1972 सालचे बांधकाम असलेल्या इमारतीचा आतील स्लॅब आणि शेजारील भिंती कोसळल्या. या दुर्घेटनेत घरातील एक महिला, दोन वर्षांची मुलगी व एक 13 वर्षांची मुलगी अडकली. याबाबत स्थानिकांनी पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रास माहिती दिली.
दरम्यान, येथील स्थानिक दुकानदार मयूर पुंडे यांनी बांधकाम कोसळ्याचा आवाज येताच घटनास्थळी धाव घेतली व दोन वर्षांची मुलगी आणि तिच्या आईला सुखरूप बाहेर काढले. पण, बाथरूममध्ये अडकलेली पौर्णिमा हिला बाहेर काढण्यासाठी मार्ग मिळत नव्हता. यावेळी अग्निशमन दलाची गाडी याठिकाणी दाखल झाली.
दुर्घटना घडलेल्या इमारतीच्या दोन्ही बाजूला पक्के बांधकाम असलेल्या इमारती आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी वीट, माती आणि लाकडाचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी इमारातीच्या भिंती आत आल्या आहेत. त्यामुळे बचावकार्य जसे पुढे जायचे तसे बांधकाम कोसळत होते. त्यामुळे बचावकार्याला उशीर होत होता. एक एक टप्पा पुढे जात 13 वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी शहरातील पाच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. त्यानंतर एनडीआरएफची एका टिमला पाचरण करण्यात आले तसेच, आर्मीचीही एक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, एनडीआरएफ टीम दाखल होण्यापूर्वीच मुलीला बाहेर काढण्यात आले होते.
बाथरूममध्ये अडकून पडलेल्या पौर्णिमा मडके हिला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास अथक प्रयत्न केले. ढिगारा काढण्यासाठी तसेच बचावकार्य पुढे जात असताना बांधकाम कोसळत असल्याने काळजीपूर्वक मुलीला बाहेर काढण्यात आले. बचावकार्यात जवांनांनी देखील जीव धोक्यात काम केल्याचे चिपाडे यांनी सांगितले.