नुकताच मुंबईतील जुहू परिसरातील आर अड्डा हा पब्ज मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला होता. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून पब्ज आणि बारला मध्यरात्रीनंतर सुरू ठेवण्यास राज्य सरकारकडून मनाई करण्यात आली. पण मुंबईमध्ये हे सर्व नियम बाजूला सारून बिनधास्तपणे पब्ज सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
जुहूसोबत विलेपार्ले येथील ‘Barrel Mansion हा पब पहाटे २ वाजेपर्यंत सुरू होता. या दोन्ही पब्जमध्ये कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर बसवण्यात आले. या पब्जमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी संगिताच्या तालावर थिरकताना दिसत आहे. या तरुण तरुणीने कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडवला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये मध्यारात्री उशिरापर्यंत पब्ज सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेकडून करण्यात आला. वरळीमधील लोअर परळ भागात मध्यरात्री उशिरापर्यंत काही पब सुरु होते. मध्यरात्रीपर्यंत सुरु असणाऱ्या या पब्जवर कारवाई करण्यात येईल असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतरसुद्धा काही पब्ज पहाटेपर्यंत चालू असल्याचे पाहायला मिळाले होते.