मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवलं जाणार असल्याची चर्चा आहे. यावरुन देशाच्या, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. तरी देखील या विषयावर जोरदार चर्चा सुरु आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हे राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्र आहे,’ असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्वीट करुन केला आहे.
सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा काल अचानक राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं तात्काळ यावर खुलासा करत ही चर्चा निरर्थक असल्याचं सांगितलं. देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही हितसंबंधीयांकडून अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही चर्चा थांबलेली नाही.
संजय निरुपम यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘शरद पवार यांच्याबद्दल सध्या सुरू असलेली चर्चा हा मुंबईपासून दिल्लीपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ जणांच्या सह्या असलेलं पत्र सोनिया गांधी यांना लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याचा अभाव असल्याचा शोध लावण्यात आला होता. काँग्रेसला संपवण्याचा एका मोठा कट आहे,’ असं निरुपम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.