पुणे : ८५ हजार रुपयांची लाच घेताना एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तर पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चाकण पोलीस स्टेशन येथे काल (दि.२९ डिसेंबर) करण्यात आली.
याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. यामध्ये चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अखतर शेखावत अली शेख (३५) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी आरोपी अखतर शेखावत अली शेख याने पोलीस उप निरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या वतीने तक्रारदारांकडे झेंडे यांच्यासाठी ७० हजार रुपये व स्वतःसाठी १५ हजार रुपये, अशी एकूण ८५ हजारांची लाच मागितली होती व ती अखतर शेखावत अली शेख याने स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.
पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक राजेश बनसोडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.