व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली 20 कोटी रुपयाची खंडणी
खंडणी विरोधी पथकाचे बालाजी पांढरे यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पुणे : पुण्यामध्ये एका तरुण व्यावसायिकाचे अपहरण करून 20 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याची घटना घडली. याप्रकरणी कुविख्यात गँगस्टर गजा मारणे व त्याच्या गॅंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून या व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली. तसेच चौघांना अटक केली आहे.
तक्रारदार यांची शेअर मार्केट व्यवहारांची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी गुंतवणूक केली होती. पण, तक्रारदार यांची कंपनी काही कारणास्तव डबघाईला आली.
हेमंत पाटील यांनी जवळपास २० कोटींची गुंतवणूक केलेली होती. त्यातील १६ कोटी तक्रारदार यांनी परत देखील केले होते. उरलेली रक्कम म्हणजेच ४ कोटी राहिले होते. ते पैसे मिळवण्यासाठी पाटील यांनी पप्पू घोलपला सांगितले होते.
यानंतर हे पैसे तक्रारदार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी गजा मारणे व त्यांची गॅंग यामध्ये सहभागी झाली. त्यांनी शुक्रवारी दुपारी या व्यावसायिकाचे कात्रज परिसरातून कारमध्ये अपहरण केले. त्याच्याकडे २० कोटींची खंडणी मागितली.
याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी अथक प्रयत्न करून या व्यावसायिकाची पप्पू घोलप व गॅंगकडून तक्रारदाराची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी एका महिलेसह गजा मारणे, पपू घोलप, हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, रुपेश मारणे व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.