औंध परिसरातील मोठ्या ‘बिल्डर’वर दरोड्याचा गुन्हा दाखल
जीवे मारण्याची धमकी देत 10 वेळा फायरिंग करण्याची धमकी
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठा व्यवसाय असणारे आणि राजकीय क्षेत्रात प्रचंड दबदबा असणाऱ्या एका बाप लेकासह चौघांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात दरोडा नुसार गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी करुन, सुरक्षा रक्षकास मारहाण करुन काम बंद पडले. तसेच साहित्य जबरदस्तीने नेवून, दहशत निर्माण केली. धक्कादायक म्हणजे जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पिस्तूलातून 10 वेळा गोळीबार करण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपळे निळख परिसरात केला.
हा प्रकार 17 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान पिंपळे निळख येथे घडला असून 24 जून 2021 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी अजिंक्य विठ्ठल काळभोर (45, रा. तुळजाई वस्ती, काळभोरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. तर नानासाहेब गायकवाड (रा. औंध), केदार उर्फ गणेश गायकवाड (रा.औंध), गणेश साठे, राजा आणि त्यांचे 2 ते 3 साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; काळभोर यांनी त्यांच्या पिंपळे निळख येथील जागेवर बांधकाम करण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. या जागेवर ले आउट करण्यासाठी कामगार आणि ठेकेदार यांच्यासह ते त्या जागेवर गेले होते. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करुन धमकी देण्यात आली. चालू असणारे काम बंद पाडले.
त्या जागेवर करण्यात आलेली संरक्षण भिंत, कंपाउंड, लोखंडी पोल, पाण्याची टाकी व इतर साहित्य असे 48 हजार रुपयांचे साहित्य जबरदस्तीने काढून नेले. सुरक्षा रक्षकास शिवीगाळ, मारहाण करुन दहशत निर्माण केली. पुन्हा या ठिकाणी आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच 10 वेळा फायरिंग करेल अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल असणाऱ्या व्यवसायिकांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठे प्रकल्प सुरु आहेत. तसेच शहरातील बड्या राजकीय नेत्यांचे जवळचे संबंध आहेत. गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपास सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेंडकर तपास करत आहेत.