मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. जन्माने ते मुस्लीम नसून महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिला आहे. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला दिलेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे, आधीच ईडीच्या चौकशीत अडकलेल्या नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 500, 501 आणि अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989 कलम 3, 1 U या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मध्ये ते एनसीबी मुंबई येथे कार्यरत असताना नवाब मलिक यांचा जावई समीर खान, करण सजनाने शाहिस्ता फर्निचरवाला या लोकांना ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सप्टेंबर 2021 मध्ये समीर खानला जामिनावर मुक्त केलेले आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2021 रोजी कार्डिलिया क्रूज ड्रग्स केस दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये 20 लोकांना अटक करण्यात आली तेव्हापासून नवाब मलिक व्यक्तिगत टीका, आरोप हे विविध प्रसार माध्यमातून करत होते. माझ्या वडिलांनी उच्च न्यायालय मुंबई येथे नवाब मलिक यांच्याविरुद्ध याचिका दाखल केलेली असून ती सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना मी आणि माझ्या कुटुंबा विरुद्ध अपमानास्पद वक्तव्य चालू ठेवल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबाबत न्यायालयाचे निर्देशास आणून दिले आहे. त्यानंतर नवाब मलिक यांना शोकॉज नोटीस जारी केली होती. त्यानंतरही नवाब मलिक यांनी त्यांचे आरोप चालूच ठेवले होते.
नंतर दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर माझ्या जात प्रमाणपत्राबाबत व्यक्तव्य केले होते. नवाब मलिक यांनी त्यांची व्यक्तिगत टिका आरोप हे 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत सतत चालूच ठेवले होते. 21 ऑक्टोबर 2021 आणि 26 ऑक्टोबर 2021 रोजी आणि नजीकच्या मागील इतर दिवशी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आणि प्रसारमाध्यमांच्याद्वारे असे जाहीर केले की मी जन्मत: मुस्लिम असून माझ्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे आहे. त्याचप्रमाणे माझे कुटुंबीय पण बोगस आहे. मी खोट्या जातीचे प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवलेली आहे आणि सरकारी नोकरी खोटी जात असल्यामुळे जाईल अशा धमक्या देत होते.
माझी आणि माझ्या कुटुंबीयांची जात महार असून, नवाब मलिक यांनी अनेक लोकसेवकांना खोटी माहिती देऊन त्यांच्या अधिकाराचा वापर होण्यास प्रवृत्त केल्यामुळे मला व माझ्या कुटुंबीयांना हानी पोहोचलेली आहे. आमचे मूळ गाव वरुड तोफा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम हे असून आम्हाला सर्वजण महार जातीचे म्हणून ओळखतात व त्याचप्रमाणे सन्मान देतात. सरकारी नोकरी आणि कामानिमित्त आमच्यातील काहीजण व विशेषतः मी आणि माझे कुटुंब हे मुंबई व मुंबई परिसरात राहिलेले आहे. नवाब मलिक यांनी हेतूपुरस्सर जाणीवपूर्वक व केवळ महार मागासवर्गीय असल्यामुळे त्रास देण्यासाठी अपमान करण्यासाठी व खोटी माहिती पुरवून संबंधित अधिकारी यांच्याकडून त्रास निर्माण करण्यासाठी वरील प्रमाणे वक्तव्य केलेले आहे. आमदार तथा महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री असतानाही एक महार अनुसूचित जातीचा अधिकारी त्यांच्या जावयाला अटक करू शकतो या कारणाने द्वेष भावनेने हेतूपुरस्सररित्या मी आणि माझे कुटुंब हे महार जातीचे नाहीत व जातीच्या आधारावरती गैरफायदा घेत आहोत, असा खोटा असा खोटा प्रचार व वक्तव्य नवाब मलिक सतत करत होते, असे समीर वानखेडे जबाबात म्हणाले.
माझे लग्न शबाना कुरेशी यांच्याशी होण्यापूर्वी मी केंद्र शासनाच्या सरकारी नोकरीत रुजू झालेलो आहे. त्यामुळे, त्यांनी केलेले खोट आरोप खोटे आहेत. तसेच, मी स्वतः अथवा माझे वडील यांनी आज रोजी पर्यंत धर्मांतर केलेले नाही. तरी मी अनुसूचित जाती व प्रवर्गात प्रवर्गाचा सदस्य असल्यामुळे नवाब मलिक यांनी माझा अवमान केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 500, 501 आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 कलम 3(1)(U) अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी विनंती समीर वानखेडे यांनी जबाबात केली आहे.