आळंदी : आळंदी येथील वडगांव रस्त्यावर चार वर्षाची चिमुकली शाळेतून तिच्या आजोबांसोबत दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
तनिषा ऊर्फ परी विशाल थोरवे (4, रा. चऱ्होली खुर्द,थोरवेवस्ती ता. खेड जि. पुणे) असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. 25 ) सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगांव रस्त्यावरील गो शाळेजवळ घडली. तनिषा ऊर्फ परी विशाल थोरवे असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर आजोबा किसन एकनाथ थोरवे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी डंपर चालक संतोष जामिरुद्दीन माल (सध्या राहणार शिर्के कंपनीजवळ, हनुमानवाडी केळगाव ता. खेड जि. पुणे) याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची किसन एकनाथ थोरवे (वय ६५ रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपीला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की, तनिषाला आळंदीतील प्रियदर्शनी शाळेतून तिचे आजोबा किसन थोरवे हे दुचाकीहून घरी घेऊन जात होते. दरम्यान वडगाव रस्त्यावरील गोशाळेसमोर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरात धडक दिली.
अपघाताची तीव्रता मोठी असल्याने तनिषाला मोठी दुखापत होऊन मृत्यू झाला. तर तिचे आजोबा किसन थोरवे यांच्या डोक्याला, हाताला, पोटाला, कमरेला मार लागून ते जखमी झाले आहेत. अपघानानंतर ट्रक चालक घटनास्थळाहून पळून जात होता. मात्र स्थानिक तरुणांनी पाठलाग करून त्यास पकडले.