पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर सिगारेटच्या गाडीवर दरोडा टाकून लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या एका सहा जणांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीच्या ताब्यातून कोयते, लोखंडी पकड, स्क्रू ड्रायव्हर आणि ११ तोळे सोने असे एकूण आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पुणे-अहमदनगर महामार्गावरून ओमनी गाडी ताब्यात घेतली. या गाडीत आरोपी सापडले. सर्व आरोपी तमिळ भाषिक आहेत.
त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन दुभाषकाच्या मदतीने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांचा ताब्यातील ओमनी गाडीतून मोबाइल, लोखंडी कोयते, स्क्रू ड्रायव्हर, अकरा तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख ३८ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.