बनावट कागदपत्रांद्वारे 7 कोटींची 151 वाहने विक्री करणारी टोळी गजाआड
महाराष्ट्रासह 8 राज्यात पसरले होते जाळे
मुंबई : बीएस 4 असल्याने आरटीओ मध्ये रजिस्ट्रेशन न होणाऱ्या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून त्याची विक्री विकणार्या 9 जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून विक्री केलेल्या जवळपास 7 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या 151 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या टोळीने महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये विविध ठिकाणी या वाहनांची विक्री करण्यात आली होती.
आनम असलम सिद्धीकी (42), शाबान रफिक कुरेशी (32), मनोहरप्रसाद व्यंकटराव जाधव (31), वसीम मोहम्मद उमर शेख (31) या चौघांना पनवेल येथून अटक केली. त्यानंतर गौरव सुभाषचंद्र देम्बला (32) आणि प्रशांत एस.नरसय्या शिवरार्थी (26) या दोघांना दिल्ली व हैद्राबाद येथून तसेच राशीद खान अहमद खान (42), चंद्रशेखर ज्ञानदेव गाडेकर (31) या दोघांना पनवेलमधून तर इमरान युसूफभाई चोपडा (38) याला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली आहे.
बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने भारत सरकारने मार्च 2020 पासून बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांना बंदी घातली आहे. शासनाने बंदी केलेल्या मारुती कंपनीच्या सियाज, ब्रिझा, सेलेरीओ, वॅगनार, इको, बलेनो, एस क्रॉस अशा वेगवेगळ्या मॉडेलच्या कार पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्यामुळे त्या कार मारुती कंपनीने भंगार म्हणून लिलावात काढल्या होत्या. यातील 407 कार चेंबूर येथील ऑटोमोटीव्ह मॅन्युफ्रॅक्चर्रस प्रा.लि. या कंपनीने भंगार म्हणून लिलावात विकत घेतल्या होत्या.
मारुती कंपनीने सदर कार ताब्यात देण्यापूर्वी सर्व कारच्या चेसीस नंबर कट करुन आनम अस्लम सिद्धीकी (42) याच्या ताब्यात पॅप करण्यासाठी दिल्या होत्या. मात्र आनम सिद्धीकी व त्याच्या इतर साथीदारांनी सदरच्या कार पॅपमध्ये न काढता त्या कारवर पुन्हा बनावट चेसीस नंबर टाकले. तसेच जुन्या रजिस्टर झालेल्या गाड्यांचे इंजिन नंबर व चेसीस नंबरची बनावट व खोटी कागदपत्रे तयार केली. त्यानंतर या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर कारचे वेगवेगळ्या राज्यातील आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावाने नोंदणी केली.
गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर पॅप करण्यासाठी देण्यात आलेली वाहने ते बनावट कागदपत्रांद्वारे विकत असल्याचे आढळून आले. त्यानंतर मध्यवर्ती कक्षातील पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्हे, दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यात या टोळीने विकलेल्या तब्बल 7 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या 151 कार हस्तगत केल्या. या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारे हिमाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेश आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन केलेल्या 5 कारदेखील हस्तगत केल्या आहेत.