पिंपरी : एका कंपनीत क्लोरिन वायूची गळती होत असलेल्या कंपनीत गेलेल्या अग्निशामक दलाच्या 13 जवानांना वायूची बाधा झाली आहे. ही घटना भोसरी एमआयडीसीत बुधवारी (दि. 8) दुपारी घडली.
अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी येथील प्लॉट क्रमांक 212, सेक्टर क्रमांक 10 येथील सत्यसाई एक्वा या कंपनीमध्ये क्लोरिन वायूची गळती झाल्याची माहिती बुधवारी दुपारी 2 वाजून पाच मिनिटांनी अग्निशामक दलास मिळाली.
त्यानुसार अग्निशामक मुख्यालय आणि भोसरी अग्निशामक उपकेंद्र येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्लोरिन वायूची गळती झाली होती. ही गळती बंद करीत असताना अग्निशामक दलाच्या 13 जवानांना बाधा झाली.
यापैकी काही जवानांना रुग्णालयात दाखल करावे लागले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. अडीच तासानंतर ही गळती थांबविण्यात अग्निशामक दलाला यश आले.