पिंपरी : चिखलीमधील कुदळवाडी भागात एका भंगाराच्या गोदामला भीषण आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कुदळवाडी मधील मोरे पाटील चौक जवळील मोरे वजन काट्याजवळ एका मोठ्या भंगाराच्या गोदामला आज पहाटे 3.45 वा चे सुमारास आग लागली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हे गोदाम सुमारे अर्ध्या एकर क्षेत्रात आहे.लाकडी सामान,प्लास्टिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य येथे साठ्वल्यामुळे त्याला आग लागली आहे. लांब पर्यंत आगीच्या धुराचे लोट दिसत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे लीडींग फायरमन (तांडेल) गौतम इंगवले म्हणाले की, “पिंपरी, चिखली, प्राधिकरण, राहटणी, भोसरी व तळवडे अग्निशमन केंद्राचे अग्निशमन बंब असे एकूण 6 बंब घटनास्थळी पोहोचले आहेत.
अग्निशमन कर्मचारी आग विझवण्याचे काम करीत आहेत. 7 ते 8 पाण्याचे टँकरमार्फत एकूण 20 ते 22 खेपा होऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आता पर्यंत झाले आहेत. रस्ते अरुंद असल्याने बंबांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे.”
ते पुढे म्हणाले की, गोदमामध्ये एक लहान घर आहे. गोदामच्या कर्मचाऱ्यांनी घरातील सामान बाहेर काढले आहे. पण आत 2 ते 3 गॅस सिलेंडर आहेत असे समजते. अग्निशमन कर्मचारी ते सिलेंडर बाहेर काढत आहेत.