पुणे : शिरूर तालुक्यातील आंधळगाव आत आज पहाटेच्या सुमारास काही नागरिकांना बिबट्याचे नुकतेच जन्मलेले एक पिल्लू आढळून आले. नुकतेच जन्मलेले हे पिल्लू रस्त्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूला असणाऱ्या उसात जाण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिक नागरिकांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असून काहीवेळा ते या पिल्याला ताब्यात घेणार आहेत.
आंधळगावातील गावातील काही नागरिक आज पहाटेच्या सुमारास शेतामध्ये जात असताना त्यांना हे पिल्लू रस्त्यावर पडलेलं आढळले. याची माहिती त्यांनी तातडीने वनविभागाला दिली. सुरुवातीला हे पिल्लू कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेल्या अवस्थेत होते. स्थानिक नागरिकांनी याला उब देत दूध पाजले. सध्या या पिल्ल्याची प्रकृती उत्तम आहे.
मागील काही दिवसांपासून आंधळगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. आजच्या घटनेवरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याची माहिती यापूर्वी वनविभागाला ही देण्यात आली होती. दरम्यान जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने बिबट्या मानवी वस्तीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात येते.