पिंपरी : भागीदारीत सुरु केलेला दवाखान्यातील एक भागीदार गावी गेला असताना तो लॉकडाऊनमध्ये गावी अडकला. याचा फायदा घेऊन दोघांच्या नावे असलेल्या हॉस्पीटलसाठी आलेले सुमारे 1 कोटी 47 लाख रुपयांचे योजनेचे पैसे दुसऱ्या भागीदार डॉक्टरने नवीन खात्यात वळवून फसणूक केली आहे. हा प्रकार चाकण येथे 14 मार्च 2020 ते 13 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी संजिव राजेंद्र भारती यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 44 वर्षीय महिला व विलास सोमनाथ गिरी (52, रा.चाकण) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्या भागीदारीमध्ये चाकण येथे समर्थ हार्ट केअर अँन्ड ट्रामा सेंटर स्थापन करून हॉस्पीटल चालवले जात होते. हा दवाखाना राज्य शासनाच्या कर्मचारी राज्य विमा निगम एम्प्लॉईज कॉर्पोरेशन (ई.एस.आय.सी.) योजनेसाठी प्रायमरी हॉस्पीटल म्हणून सल्गन करण्यात आला होता. यातील फिर्यादी हे 14 मार्च 2020 रोजी गावी बीडला गेले होते.
या कालावधीत आरोपींनी फिर्यादीच्या संमती शिवाय दोघा भागीदारांच्या नावाने दुसरे भागीदारी पत्र नोटराईज करून त्याद्वारे दुसरे बँक खाते काढले. फिर्यादीचे मुळ भागीदारी संस्थेचे व्यवसायाचे ई.एस.आय.सी. योजनेचे 1 कोटी 47 लाख 59 हजार 129 रुपये नवीन खात्यात वळवून घेतले. तसेच डॉ. रविंद्र इंगळे यांचे एमबीबीएस चे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांचा संमतीशिवाय वापर केला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.