मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून मुंबईतील डोंबिवलीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धोका वाढू लागला आहे. आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. ही स्थिती लक्षात घेता देशपातळीवर आणि राज्यपातळीवर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एकीकडे हे सगळं सुरु असताना दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रवाशाला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या रुग्णाचे नमुने आज जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच संबंधित रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांचीही तपासणी केली जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांनी सांगितले.