पुणे : चतुःश्रृंगी परिसरात बेकायदेशीर रॅमिडेसिवीर विक्री प्रकरणात कारवाई केल्यानंतर ‘त्या’ आरोपींच्या नातेवाईकांबरोबर एका पोलिस अधिकाऱ्याने पार्टी करत मुलींची छेडछाड काढली. याबाबत तक्रार दिल्यानंतर संबंधित उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.
उपनिरीक्षक दीपक माने असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे संबंधितांकडून तक्रार आली होती. या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षकास निलंबित केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपनिरीक्षक दीपक माने हे युनिट-4 येथे नेमणुकीस आहेत. गेल्या आठवड्यात (दि. 17) चतुःश्रृंगी परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीर रॅमिडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्यास आलेल्या दोन सख्या भावांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले होते.
याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर उपनिरीक्षक माने यांची यातील आरोपींच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. ओळखीनंतर त्या व्यक्तींने त्यांना पार्टीसाठी आमंत्रित केले.
माने देखील पार्टीसाठी गेले. यावेळी त्यांनी मद्यपान केले. मद्यपान केल्यानंतर माने यांनी मुलींची छेडछाड काढली, अशी तक्रार केली. त्या मुली अल्पवयीन असल्याची माहिती आहे. त्यानंतर या मुलींच्या नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार तात्काळ माने यांना निलंबित करण्यात आले आहे.